Skip to main content

Lekh on Narayan Kelkar


...... समर्थ पायाचा नारायण ......
जे व्हायला हवे होते, ते सांगलीच्या विसावा चौकातील कार्यकर्त्यांनी मनावर घेऊन केले. शिवोत्सवाचे निमित्त साधून त्यांनी श्री.नारायण गणेश केळकर या असामान्य माणसाचा हृद्य सत्कार केला. बऱ्याच वेळा, बऱ्याचजणांनी, बऱ्याच जणांकडे यापूर्वी तसे बोलून दाखविले असेल पण सबब कोणतीही असो नारबा केळकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सामुदायिक किंवा जाहीर योग जमून आला नव्हता, ती कर्तृत्त्व नोंद आता झाली याचे मोठेच समाधान आहे.
गावभाग सांगलीतील साऱ्या जुन्या नागरिकांना नारायण गणेश केळकर ही व्यक्ती ठाऊक आहे. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९५३ चा म्हणजे आज त्यांना ६० वे वर्ष चालू आहे. १९६०-७०च्या दशकात हा आठ-दहा वर्षांचा मुलगा त्याच्या वयाला न शोभणारी कुबडी आपटत एका पायावर पळापळी करत असताना दिसायचा. बालपणी समई अंगावर पडून पाठीवर भाजल्याचा मोठा प्रशस्त व्रण, आणि कधीतरी उंबऱ्यात अडखळून पाय मोडल्याचे दुखणे पोळत हे पोरगं जवळपासच्या सगळया घरांतून वावरायचं. आई धुणी-भांडी करून पोट चालवायची. दारिद्र्याचा कधी उच्चारही न करता साऱ्या सभोवतालचा हा `नाऱ्या' हे चटके कसे सोसत होता, याचे भान आज पुष्कळांना आले असेल. एकेकदा दुपारी न जेवताही कुणा शेजारघरी जेवणाच्या वेळेवरच गेला तर हा नारबा बाहेरच्या खोलीत खेळत बसायचा. तो जेवलेला नाही हे त्या घरच्या माऊलीला कळलं तर ताटली वाढून मिळे, तीही प्रत्येक घरी मिळेलच असे नाही. पण या नारायणाच्या मुखावर कधी आशाळभूतपणा दिसायचा नाही.
अशा स्थितीतून नारायण मोठा झाला. आज `सर्वे%पि सुखीन: सन्तु' अशा संपन्न विचारांनी नारायण केळकर राहतात, हा केवढा थोरपणा!!
मधल्या काळात शाळेच्या शिक्षणानंतर नारायण कामचलाऊ भिक्षुकी शिकला. खाडिलकर गल्लीतील शंकराच्या देवळात आणि इतर काही पूजा असतात. प्राप्ती होते. जुन्या वाड्याचे `अपार्टमेंट' झाले, त्यात दोन खोल्या मिळाल्या. लग्नही झाले. हे झाले प्रापंचिक. त्यांच्या मोठेपणाचा अजब किस्सा केवळ एक उदाहरण म्हणून सांगण्याजोगा आहे. सकाळी लवकर देवळात पूजेला जाताना त्यास रस्त्याकडेला एक नोट सापडली. थोड्या थोड्या अंतरावर आणखी चार-सहा नोटा मिळत चांगले हजारभर रुपये सापडले. यानी परत येताना रस्त्याच्या काही घरांतून कल्पना दिली. कुणी शोधाशोध करत आला तर कळवायला सांगितले. देवळाबाहेर फलक लिहून ठेवला. आठ-पंधरा दिवस गेले. कुणी आले नाही. नारायणांनी स्वत:कडचे शे-पाचशे रुपये घालून ती रक्कम मिरजेच्या अपंग संस्थेला देऊन टाकली.
यापूर्वी त्यांनी लाकडी पाय (जयपूर फुट) बसवून घेतला, त्यांना शब्दश: पाय फुटले! त्यांनी प्रवास-फिरणे मनसोक्त सुरू केले. देवगिरीचा किल्ला, वणीची सप्तशृंगी ते चढून गेले. त्यांचा जन्म २३ जानेवारीचा - म्हणजे नेताजी सुभाषचंद्रांचा जन्मदिन. आपल्या वाढदिवसाऐवजी सुभाषबाबूंचे स्मरण म्हणून ते रक्तदान करतात; याशिवाय बाबू गेनूच्या पुण्यतिथीला आणि १५ ऑगस्ट तर आहेच. म्हणजे गेल्या ४० वर्षांत त्यांनी सुमारे १२० वेळा रक्तदान केले आहे. बाबू गेनू रक्तदाता न्यासाला त्यांनी ४ हजाराची देणगी दिली. या दांपत्त्याने नेत्रदान, देहदान यांचे संमती फॉर्म्स तर कधीच भरून दिलेत.
आपल्या कमाईतून सामाजिक कामाला देण्यासाठी त्यांचा हात इतका सढळ असतो की, घेणाऱ्यानेच अचंबा व्यक्त करावा. नारायण बालपणी जिथे पोराटोरांच्यात लंगड्या पायानं आणि बिनअंगरख्याच्या पाठीनं हुंदडायचा त्या बलभीम व्यायामशाळेचे नूतनीकरण करण्यासाठी कार्यकर्ते पैसे जमवीत होते. नारायणाने ५ हजार रुपये स्वयंस्फूर्त पाठविले. ते तसेच घेऊन संस्थेचे सचिव नारायणाकडे गेले. ``नारबा, काही चूकभूूल-घोटाळा तर नाही ना?'' नारायणानी `ते कर्तव्य आहे' असे कृतज्ञतेने सांगून त्यात चूक नसल्याचे म्हटले. हे सर्व आश्चर्यकारक!
नारायण केळकर आता साठीचे झाले. पायाला पुटकुळी आली तर वर्षभर वेदना सांगणारे हे जग. दोन रुपये देवापुढे टाकले तर फलकावर नाव कोरू इच्छिणारे हे जग. ते चालले आहे अशा नारायणाच्या एका पायावर! म्हणून ते दु:खावर समाधानाने मात करू शकते. `जमेल तेवढे करू' असे म्हटले तर खूप काही जमू शकते हे नारबांनी सिद्ध केले आहे. चेहऱ्यावरच्या गाठी आणि सामान्य रूपात एका पायावर दुडकत जाणारी ही व्यक्ती असामान्य आहे.

Comments